शबरीमाला : केरळमधील चार तृतीयपंथीयांनी (लिंग परिवर्तन केलेले) साडी परिधान करून मंगळवारी शबरीमाला मंदिरात भगवान आय्यपांचे दर्शन घेतले. त्यांना रविवारी दर्शनाची परवानगी नाकारण्यात आली होती; पण त्यांच्या तक्रारीनंतर त्यांना ती देण्यात आली.शबरीमाला येथे दाखल झाल्यानंतर अनन्या, तृप्ती, रेंजुमल आणि अवंतिका यांनी आपल्या पसंतीचा पोशाख म्हणजेच साडी परिधान करून दर्शन घेतले. सकाळी आठ वाजता हे चौघे भाविक दर्शनासाठी दाखल झाले.
सकाळी पावणेदहा वाजता त्यांनी मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतले. त्यांच्या मंदिर प्रवेशाला वा दर्शनाला आज कोणीही विरोध केलानाही. या चारही भक्तांना रविवारी पोलिसांनी रोखले होते. त्यानंतर त्यांनी कोट्टयमच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यांनी सोमवारी केरळ उच्च न्यायालयाने आयप्पा मंदिरातील प्रवेशाच्या वादात मदत करण्यासाठी नियुक्त केलेलेपोलीस महासंचालक ए. हेमचंद्रन यांच्याशी संपर्क केला. भाविकांच्या देखरेखीसाठी जी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे त्या समितीचे हेमचंद्रन एक सदस्य आहेत. केरळ उच्च न्यायालयाने २७ नोव्हेंबर रोजी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली होती. या समितीत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. आर. रामन आणि एस. सिरिजागन यांचा समावेश आहे. हेमचंद्रन यांच्या सूचनेवरून या चौघांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला. त्यांना कोणी विरोध करू नये, म्हणून ते मंदिरात जाईपर्यंत पोलीस त्यांच्यासोबत होते. अर्थात कोणी विरोध न केल्याने त्यांना शांतपणे दर्शन घेता आले.
स्वप्न झाले पूर्णसर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयानंतर या भागात वातावरण तणावपूर्ण आहे. १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांनाही मंदिरात प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. दरम्यान, आजच्या दर्शनामुळे आपण अतिशय आनंदी असल्याचे या चारही भक्तांनी सांगितले. पूजा करण्याची संधी मिळाल्याने आपल्या आयुष्यातील एक स्वप्न पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.