J-K Assembly Elections 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी केली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त असून उमेदवारांची घोषणाही करत आहेत.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचं ठरवलं आहे. त्यामुळं काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. मंगळवारी म्हणजेच आज राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये दोन सभा घेणार आहेत.
रामबन आणि अनंतनागमध्ये राहुल गांधींची रॅलीकाँग्रेस नेते राहुल गांधी आज जम्मू-काश्मीरमध्ये दोन निवडणूक रॅली घेणार आहेत. राहुल सकाळी १० वाजता विशेष विमानाने जम्मूला रवाना होतील आणि दुपारी १२ वाजता रामबनमध्ये पहिल्या रॅलीला संबोधित करतील. यानंतर राहुल गांधी दुपारी १ वाजता अनंतनागला रवाना होतील आणि दुपारी १.३० वाजता अनंतनागमधील दुसऱ्या रॅलीला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता राहुल श्रीनगरहून दिल्लीला विशेष विमानाने रवाना होतील.
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र लढणार२०१४ च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र लढणार आहेत. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटून घेतल्या आहेत. विधानसभेच्या एकूण ९० जागांपैकी नॅशनल कॉन्फरन्स ५१ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस ३२ जागांवर लढणार असून पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. याशिवाय, मित्रपक्ष सीपीआयएम आणि पँथर्ससाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत.
मतदान कधी होणार आहे?जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर, विधानसभा निवडणुकीचे निकाल निवडणूक आयोगाकडून ४ ऑक्टोबरला जाहीर केले जाणार आहेत.