ऑनलाइन लोकमत श्रीनगर, दि. 26 - काश्मीरमध्ये ईदच्या दिवशीच सुरक्षा जवानांवर स्थानिक तरुणांनी दगडफेक केली आहे. श्रीनगरमधील ईदगाह मैदानात मोठ्या प्रमाणात तरुण जमा झाले होते. त्यानंतर त्यांनी सुरक्षा जवानांसह पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी नळकांड्याही फोडल्या. काश्मीरमधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यास परवानगी दिली नव्हती. ईदच्या निमित्तानं जम्मू काश्मीरमधल्या अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र ईदगाह मैदानावर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याच्या भीतीपायी पोलिसांनी या ठिकाणी जमावबंदी लागू केली होती. पोलिसांचा जमावबंदी आदेश झुगारून ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते. त्यानंतर जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्याच वेळी अनंतनागमध्येही दगडफेक करणारे तरुण आणि सुरक्षा दलाचे जवानांमध्ये वाद झाला. (जम्मू-काश्मीरमध्ये मशिदीबाहेर जमावाकडून पोलीस अधिकाऱ्याची बेदम मारहाण करून हत्या)तर गेल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये जमावानं मशिदीबाहेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करून या हत्येच्या घटनेला दुजोरा दिला होता. गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली होती. मोहम्मद आयुब पंडित असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव होतं. तो नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात होता. रमझानच्या महिन्यातील शेवटचा शुक्रवार लक्षात घेता मशिदीबाहेरच्या चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मशिदीच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीसही गस्त घालत होते. यावेळी जामिया मशिदमध्ये "शब-ए-कद्र"ची प्रार्थना सुरू होती. रमझानमधील नमाज पठण असल्यानं खबरदारी म्हणून मशिदींबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तिथे पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडितही तैनात होते. ते मशिदीचा फोटो काढत असल्याचा जमावाचा गैरसमज झाला. काही वेळ गोंधळ उडाला. पोलीस अधिकाऱ्यानं हवेत गोळीबार केला होता. त्यात 3 लोक जखमी झाले. त्यानंतर जमावाने पोलीस उपअधीक्षक पंडित यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण केली होती आणि या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
जम्मू-काश्मीरमध्ये ईदला गालबोट, आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक
By admin | Published: June 26, 2017 5:14 PM