श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील शोपिया येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेच चकमक झाली आहे. या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला असून सध्या शोधमोहीम सुरूच आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. सुरक्षा जवान आणि सैन्य दलाने सीमारेषेवर केलेल्या कडक कारवाईंमुळे दहशतवादी वैतागले असून ते सातत्याने भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भारतीय सैन्य त्यांच्या या प्रयत्नाला चारीमुंड्या चीत करत आहे.
दहशतवाद्यांकडून काश्मीर खोऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस आणि सुरक्षा जवानांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र, नेहमीच अलर्ट असलेल्या सैन्यातील जवानांकडून त्यांचे हे प्रयत्न हानून पाडण्यात येत आहेत. दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर ए-तोएबा आणि पाकिस्तानची एजन्सी असलेल्या आयएसआयकडूनही दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन भारतात दहशतवादी कारवायांसाठी कट रचण्यात येत आहेत. उरी सेक्टरमध्ये काही दिवसांपूर्वीच पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवादी बाबरने याबाबतचा खुलासा केला होता.
जवानांनी ठार केलेल्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटली नाही. पण, सुरक्षा यंत्रणांकडून अद्यापही शोधमोहीम सुरू असून ओळख पटविण्याचंही काम करण्यात येत आहे.