जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केल्याचे समोर आले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा भागात दहशतवाद्यांनी पोलीस/सीआरपीएफच्या संयुक्त नाका पार्टीवर गोळीबार केला. या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला आहे. जखमी पोलिसाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू आहे.
याआधी बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बिहारमधील एका स्थलांतरित मजुराची गोळ्या झाडून हत्या केली होती. काश्मीर झोनच्या पोलिसांनी सांगितले की, "मध्यरात्री बांदीपोरा येथील सोडनारा संबलमध्ये बिहारमधील मधेपुरा येथील बेसाढ येथील रहिवासी मोहम्मद अमरेज, त्यांच्या मुलगा मोहम्मद जलील यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर या दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला."
गुरुवारी दहशतवाद्यांनी राजौरी जिल्ह्यातील लष्कराच्या छावणीवर आत्मघाती हल्ला केला, ज्यात चार जवान शहीद झाले. सुरक्षा दलाच्या प्रत्युत्तरादाखल दोन दहशतवादीही ठार झाले. पोलिसांनी सांगितले की, दहशतवादी घातक 'स्टील कोअर' गोळ्यांनी सज्ज होते आणि चार तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या चकमकीत दोन्ही दहशतवादी मारले गेले. पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले की, हल्ला करणारे दोघेही दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असावेत. दोघांनी छावणीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण ते मारले गेले. या कारवाईत भारतीय लष्कराचे सहा जवान जखमी झाले, त्यापैकी चार जवान नंतर शहीद झाले.