जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत १० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातानंतरही बचावकार्य सुरू आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन चौपदरी बोगद्यावरील डोंगर कोसळल्याच्या घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या बचाव कार्यात इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) सहभागी आहेत. 15 व्या बटालियन ITBP चे जवान एका स्निफर डॉगसह बचाव कार्यात सहभागी आहेत.
जम्मू-काश्मीरमधील बांधकाम सुरु असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजता घडली. या घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १० जणांचा मृत्यू झाला असून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेल्या १० मृतांपैकी पाच जण पश्चिम बंगाल, एक आसाम, दोन नेपाळ तर दोघे स्थानिक आहेत, अशी माहिती रामबनचे डीसी मुसरत इस्माल यांनी दिली आहे. तसेच हे बचाव कार्य पूर्ण झाल्याचे त्यांनी दिली आहे. घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व कामगारांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.