नवी दिल्ली - अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर आता भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमित शहा हे भाजपाचे अध्यक्षपद सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र अमित शहा यांना भाजपाच्या अध्यक्षपदी कायम ठेवून पक्षात कार्यकारी अध्यक्ष या पदाची निर्मिती करण्यात आली.
अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने अनेक निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची गृहमंत्रिपदी नियुक्ती केल्यानंतर आपल्याकडील पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे सोपवावी, असे शहा यांनी सांगितले होते. त्यानुसार पक्षाच्या संसदीय मंडळाने जे.पी. नड्डा यांची नियुक्ती पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी केली आहे, अशी माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी दिली.
भाजपाच्या नव्या अध्यक्षाबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर, माजी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे नाव आघाडीवर आहे. मनोहर पर्रीकर यांनी २0१७ साली संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्यात जाण्याचे ठरवले, तेव्हा शहा यांना मंत्रिमंडळात घेण्याचा विचार झाला होता. तेव्हाही नड्डा यांचे नाव पक्षाध्यक्षपदासाठी पुढे आले होते. पण त्या वेळी तसे घडले नव्हते.
उत्तर प्रदेशातील ८0 पैकी ६२ जागा जिंकून देण्यात नड्डा यांचा मोठा वाटा आहे. तसेच ते रा. स्व. संघाचे कट्टर स्वयंसेवक असून, अभाविपमध्येही ते सक्रिय होते.