जबलपूर: राजस्थानमधील जबलपूर येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातातनांदेड येथील संत त्यागी महाराज यांच्यासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चौघे किरकोळ जखमी आहेत. संत त्यागी महाराज छत्तीसगडहून महाराष्ट्रात परतत होते. यादरम्यान ओव्हरटेक करताना आज(शुक्रवार)सकाळी हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यागी महाराज यांची कार भरधाव वेगाने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. ट्रॉलीच्या चालकाने पार्किंग लाइट लावला नव्हता आणि रस्त्यावर धुकेही खूप होते, त्यामुळेच चालकाला ट्रॉली दिसली नाही. या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेले संत त्यागी महाराज आणि त्यांच्या मागे बसलेल्या शिष्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.
सिहोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ताराम पुयड (वय 27, रा. पुणेगाव पोलीस स्टेशन, नांदेड, महाराष्ट्र) यांनी सांगितले की, ते 7 फेब्रुवारी रोजी सहकारी संभाजी बालाजी जाधव यांच्यासह बाबाजी त्यागी महाराज (50), बळीराम पुयड (38), रामचंद्र पांचाळ (32) आणि माधव पांचाळ (22) हे अडागरा नंद महाराज यांच्या चुनार आश्रमात (छत्तीसगड) गेले होते. तेथून 10 फेब्रुवारीच्या रात्री ते रतनकुमारसोबत नांदेडला परतत होते. बालाजी जाधव हे वाहन चालवत होते. यादरम्यान धुक्यामुळे हा अपघात झाला.
दोघांचा जागीच मृत्यू
पहाटे साडेपाच वाजता हे सर्व लोक कटनी-जबलपूर महामार्ग NH-30 च्या महागवान तिराहे येथे पोहोचले होते. यादरम्यान ओव्हरटेक करताना कार एका रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॉलीला धडकली. या अपघातात बाबा त्यागी नंद महाराज व बळीराम पुयड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ट्रॉली चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
सिहोरा पोलिसांनी ट्रॉली चालक मोहम्मद नफीस(रा. शाहिपूर जेठवारा, प्रतापगढ) याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पीएमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.