...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! 'तो' सेल्फी बेतला जीवावर; सासूचा मृत्यू, होणारी सून बेपत्ता, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 11:49 IST2022-01-08T11:46:57+5:302022-01-08T11:49:03+5:30
मध्य प्रदेशातील जबलपूरच्या भेडाघाट परिसरात नर्मदा नदीत सेल्फी घेताना मुंबईच्या दोन महिला बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! 'तो' सेल्फी बेतला जीवावर; सासूचा मृत्यू, होणारी सून बेपत्ता, काय घडलं?
नवी दिल्ली - सेल्फ काढण्याची अनेकांना खूप आवड असते. पण काही वेळी सेल्फी घेताना केलेला हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरच्या भेडाघाट परिसरात नर्मदा नदीत सेल्फी घेताना मुंबईच्या दोन महिला बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यापैकी 50 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला असून 22 वर्षीय तरुणी नदीपात्रात बेपत्ता आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये राहणारे सोनी दाम्पत्य आपला मुलगा राज सोनी आणि होणारी सून रिद्धी पिछाडिया यांच्यासोबत मध्य प्रदेशात पर्यटनाला गेल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील तिलवारा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या भेडाघाट परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. सेल्फी घेताना दोघी महिला वाहून गेल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. 53 वर्षीय अरविंद सोनी, त्यांची पत्नी हंसा सोनी (50 वर्ष), मुलगा राज सोनी (23 वर्ष) आणि होणारी सून रिद्धी पिछाडिया (22 वर्ष) हे भेडाघाटला आले होते. दुपारी हंसा आणि रिद्धी दगडांवर उभ्या राहून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्यांचा तोल गेला आणि त्या नदीच्या पात्रात वाहून गेल्या.
मुंबईच्या दोन महिला मध्य प्रदेशमध्ये बुडाल्या
स्थानिकांनी उड्या मारुन हंसा सोनी यांना बाहेर काढलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह मेडिकल कॉलेजला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं आहे. रिद्धीचा शोध अजूनही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंसा आणि रिद्धी 12 जानेवारी रोजी पुन्हा मुंबईला परत येणार होत्या. पण ही दुर्घटना त्याआधीच झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.