जनतेचा त्रास पाहवेना; ५० लाखांचं कर्ज काढून घेतलेली जमीन आमदाराने रुग्णालयासाठी केली दान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 12:44 PM2024-07-05T12:44:42+5:302024-07-05T12:45:56+5:30
Santosh Barkade : भाजपाचे आमदार संतोष बरकडे यांनी देश आणि राज्यातील मंत्री आणि नेत्यांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे.
मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका आमदाराने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या आमदाराला जनतेच्या वेदना पाहावल्या नाहीत, तेव्हा त्याने मोठा निर्णय घेतला. त्यांनी एक एकर जागा विकत घेतली आणि हॉस्पिटल बांधण्यासाठी ती जागा दान केली. या जमिनीचा बाजारभाव तब्बल ५० लाख रुपये आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही जमीन त्याने कर्ज घेऊन खरेदी केली आहे.
जबलपूरच्या सिहोरा विधानसभेतील भाजपाचे आमदार संतोष बरकडे यांनी देश आणि राज्यातील मंत्री आणि नेत्यांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, या जमिनीवर रुग्णालय बांधण्याचं काम सुरू झालं आहे. हा निर्णय का घेतला, या प्रश्नावर ते म्हणाले की, कुंडम तहसील हा प्रामुख्याने आदिवासी भाग आहे. येथे सुमारे ६० हजार लोकसंख्या आहे. ही लोकसंख्या गरीब आदिवासी वर्गाची आहे. अनेक वर्षांपासून येथे आरोग्य केंद्र बांधण्याची गरज होती. कोणताही आजार किंवा अपघात झाल्यानंतर रुग्णाला कुंडमपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या जबलपूरला जावं लागतं.
विशेषत: गर्भवती महिलांना प्रसूती किंवा तपासणीसाठी जबलपूरला नेणे ही मोठी समस्या होती. आमदार झाल्यानंतर मला माहिती मिळाली की, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी निधी आला आहे, परंतु रुग्णालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही. हे ऐकल्यानंतर मी माझ्या जवळच्या मित्राशी या विषयावर चर्चा केली. त्यानंतर पडरिया गावाबाहेर सुमारे ५० लाख रुपये किमतीची एक एकर जमीन खरेदी केली आणि ती रुग्णालय बांधण्यासाठी दान केली.
आमदार बरकडे यांच्याकडे स्वत:च्या उत्पन्नाचे कोणतेही मोठे साधन नाही हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ते स्वत: दोन खोल्यांच्या घरात राहतात, पण त्यांच्या मतदारसंघातील गरीब आणि मागासलेल्या लोकांसाठी काहीही करायला तयार आहेत. विशेषत: त्यांना जनतेच्या आरोग्याची काळजी वाटत होती. त्याच्या मनातील इच्छा प्रेरणा देत राहिली. त्याचा परिणाम असा झाला की, त्यांनी कर्ज घेऊन ही जमीन खरेदी केली. आता ते त्यांच्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड करतील. पडरिया येथे बांधण्यात येणारे हे रुग्णालय जवळपास ६० गावांतील लोकांना आरोग्य सुविधा पुरवणार आहे.