जबलपूरच्या गोरखपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रामपूरच्या एकलव्य आदर्श निवासी शाळेच्या वसतिगृहात शेकडो मुलं जेवल्यानंतर अचानक आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक मुलांना चक्कर येऊ लागली. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर ही माहिती संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासनाला देण्यात आली. आजारी मुलांना घाईघाईने सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण फूड पॉयझनिंगशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकलव्य आदर्श निवासी शाळेच्या वसतिगृहात सुमारे 450 मुलं राहतात. येथे राहणाऱ्या मुलांनी संध्याकाळी फणसाची भाजी खाल्ली होती. अन्न खाल्ल्याबरोबर मुलांना उलट्या होऊ लागल्या. यानंतर वसतिगृह व्यवस्थापनाने तातडीने रुग्णवाहिका आणि खासगी वाहने बोलावून आजारी मुलांना रुग्णालयात पाठवलं. आजारी पडणाऱ्या मुलांची संख्या एवढी जास्त होती की त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करणं शक्य नव्हतं.
100 हून अधिक मुलं पडली आजारी
मोठ्या संख्येने आजारी पडलेल्या मुलांपैकी काही मुलांना शास्त्री पुलावर असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काही मुलांना व्हिक्टोरिया आणि मेडिकल हॉस्पिटलमध्येही उपचारासाठी नेण्यात आले. सिव्हिल सर्जन मनीष मिश्रा यांनी सांगितले की, अन्नातून विषबाधा झालेल्या अनेक बालकांची गंभीर स्थिती पाहता त्यांना आयसीसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत सुमारे 100 मुले आजारी पडल्याची माहिती मिळाली.
वसतीगृह व्यवस्थापनावर आरोप
मुलांचे कुटुंबीयही माहिती मिळताच रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी वसतीगृह व्यवस्थापनावर त्यांना मेनूनुसार जेवण न दिल्याचा आरोप केला आहे. शाळा व्यवस्थापन मुलांची योग्य काळजी घेत नसून त्यांच्याकडे तक्रार केली असता ते त्यांच्याशी नीट बोलतही नाहीत, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, शहरातील अनेक रुग्णालयात आजारी बालकांवर उपचार सुरू असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.