फणस डोक्यात पडल्यामुळे 'तो' जखमी झाला अन् वैद्यकीय तपासणीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 08:13 AM2020-05-25T08:13:32+5:302020-05-25T08:36:01+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : कासारगोड येथील एक व्यक्ती झाडावरून फणस काढत होता. त्यावेळी एक फणस त्याच्या डोक्यावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि पाठीला मार लागला.
कासारगोड : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीन दिवसात देशात दररोज सहा हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. बहुतेक लोकांना कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे लागण झाली आहे. यातच केरळमधील कासारगोड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या डोक्यावर फणस पडल्यामुळे तो जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय तपासणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कासारगोड येथील एक व्यक्ती झाडावरून फणस काढत होता. त्यावेळी एक फणस त्याच्या डोक्यावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि पाठीला मार लागला. तसेच, या घटनेमुळे त्याचे हात व पाय देखील व्यवस्थित काम करीत नव्हते. त्यानंतर त्याला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणीनंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती ऑटो चालक असल्याचे सांगण्यात येते.
डॉक्टरांनी सांगितले की, "रुग्णालयात एक नियम तयार करण्यात आला आहे. यामध्ये ज्यावेळी शस्त्रक्रियेची आपत्कालीन केस येते. त्यावेळी संबंधित व्यक्तीची कोरोना तपासणी केली जाते. या तपासणीत सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला."
या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. मात्र, त्याच्या तेथील प्रवासाचा कोणताही इतिहास नव्हता. किंवा तो कोणत्याही कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात नव्हता. परंतु, ऑटो चालविण्याच्यावेळी तो एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांतील सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, केरळमध्ये आतापर्यंत ७९५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर, देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १ लाख ३० हजारांच्या पुढे गेला आहे.