कोलकाता : हैदराबाद, जेएनयू, अलिगढ आणि अलाहाबादपाठोपाठ पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठातील डाव्या विचारांचे विद्यार्थी तसेच प्राध्यापकांवरही राष्ट्रविरोधी असल्याचे आरोप सुरू झाले असून, त्यामुळे तेथेही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथील कुलगुरू यांच्यावरही भारतीय जनता पार्टीने आरोप सुरू केले आहेत, त्यातच विद्यापीठाचे वेगाने ‘अशांत’ केंद्रात होत असून अधिकाऱ्यांनी या प्रकाराविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे पश्चिम बंगालचे राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांनी म्हटल्यामुळे वादात भरच पडली आहे.जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. तेव्हापासूनच डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांवर राष्ट्रविरोधी असल्याचे आरोप अभाविप व भाजपाच्या नेत्यांनी सुरू केले होते. त्या वेळी कुलगुरूंनी विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या नाहीत, असे स्पष्ट केले होते. या विद्यापीठावर सुरुवातीपासून डाव्यांचे वर्चस्व असून, तिथे अभाविपला कधीच स्थान मिळालेले नाही. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वादावादी कायमच होत आली आहे. भाजपाचा आरोपप्रदेश भाजपा अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, सेन्सॉर मंडळाने मंजुरी दिलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन रोखले. या चित्रपटात डाव्या विचारांच्या विरोधात काही दृश्ये आहेत. डाव्या पक्षांचे समर्थन असणाऱ्या विद्यार्थी संघटना त्याला विरोध करीत आहेत. विद्यापीठात भारतविरोधी घोषणा दिल्या जात आहेत.
जादवपूर विद्यापीठही पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: May 08, 2016 3:59 AM