आंध्र प्रदेशात सत्ता परिवर्तन होताच माजी मुख्यमंत्री वायएसआर जगन मोहन रेड्डी हे सध्या राजमहालमुळे चर्चेत आले आहेत. हा राजमहाल एकूण ४५२ कोटी रुपये खर्च करून बांधला जात आहे. आंध्र प्रदेशमध्ये याला जगन पॅलेस किंवा जगन महाल असे म्हटले जात आहे. या महालाचे फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
वायएसआर जगन मोहन रेड्डी यांचा रुशिकोंडा येथील टेकडीवर हा महाल तयार होत आहे. यामध्ये थिएटर हॉल, १२ आलिशान बेडरूम, प्रत्येकी १५ लाख रुपये किमतीचे २०० झुंबर बसवण्यात आले आहेत.तसेच, या महालाच्या इंटेरिअरवर ३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याशिवाय, या जगन पॅलेसमध्ये लाखो रुपयांची स्पा सेंटर्स आणि लाखो रुपयांची मसाज टेबल्स आहेत.
विशेष म्हणजे, या महालात ४० लाख रुपये खर्च करून फक्त बाथरूम बांधण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येकी १२ लाख रुपये किमतीचे कमोड आहेत. हा महाल ९.९ एकर जागेवर बांधला जात आहे. यामध्ये बँक्वेटची सुविधा, अत्याधुनिक कॉन्फरन्स हॉल, मोठे कॉरिडॉर आणि शानदार लाईटिंगची व्यवस्था आहे. या राजमहातून समुद्रकिनाऱ्याचे दृश्य अप्रतिम दिसते.
मिळालेल्या माहितीनुसार, रुशिकोंडा टेकडीवर बांधण्यात आलेल्या जगन पॅलेसमध्ये जवळपास सात ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. या इमारतींमध्ये सुपर लक्झरी सुविधा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, हा महाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टीडीपीने म्हटले आहे की, हा महाल व्यक्तिगत वापरासाठी तयार केला जात आहे. तर जगन मोहन रेड्डी यांच्या पार्टीकडून हा महाल जनतेसाठी तयार करण्यात येत आहे, असा दावा केला जात आहे.
टीडीपीचा आरोप काय?जगन मोहन रेड्डी आंध्र प्रदेशची निवडणूक हरल्यानंतर आता सत्ताधारी टीडीपीने आरोप केला आहे की, टूरिझम प्रोजेक्टच्या आडून व्यक्तिगत वापरासाठी जगन मोहन रेड्डी राजमहाल बनवत आहेत. रुशिकोंडा टेकडीवर हे बांधकाम करत असताना पर्यावरणाचे नियम पाळले जात नाहीत. अनेक नियम डावलून हे बांधकाम करण्यात येतं आहे. नियम डावलून ५०० कोटी रुपये खर्च करुन हा राजमहाल उभारला जात आहे, असाही आरोप करण्यात आला आहे.