लोकसभा निवडणुकीबरोबर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही झाल्या आहेत. यापैकी आज दोन राज्यांचे निकालही जाहीर झाले आहेत. अशातच या राज्यांपैकी सर्वात मोठे आणि दक्षिणेतील महत्वाचे राज्य असलेल्या आंध्र प्रदेशचा एक्झिट पोल आला आहे. यामध्ये भाजपा अवघ्या दोन टक्के मतांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या खुर्चीला सुरुंग लावण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
रेड्डी यांच्या सरकारने ३० मे रोजी पाच वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी टीडीपी-भाजपाने कडवी टक्कर दिली आहे. इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार रेड्डी यांच्या पक्षाला जास्त मते मिळत असली तरी भाजपा-टीडीपी सत्ता स्थापन करण्याची चिन्हे दिसत आहेत. रेड्डींच्या वायएसआरसीपीला ४४ टक्के मते तर टीडीपीला ४२ टक्के मते मिळताना दिसत आहेत. तर भाजपाला २ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. ही दोन टक्के मतेच रेड्डींचा सत्तेचा सारीपाट हलवून टाकण्याची शक्यता आहे.
भाजपाला आंध्र प्रदेशमध्ये ४-६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. टीडीपीला ७८ ते ९६, जेएसपीला १६-१८, काँग्रेसला ०-२ आणि रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला ५५ ते ७७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पवन कल्याण यांची जन कल्याण पक्षाला सात टक्के मते मिळताना दिसत आहेत. भाजपा आणि पवन कल्याण हे दोघे रेड्डी यांना सत्तेतून खाली खेचण्यास कारणीभूत ठरणार आहेत.
या एक्झिट पोलनुसार १७५ पैकी एनडीएच्या खात्यात ९८ - १२० जागा जाण्याचा अंदाज आहे. २०१९ मध्ये वायएसआर काँग्रेसने १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या होत्या. टीडीपीला २३ जागा मिळाल्या होत्या. तर जनसेना पक्षाला एक जागा मिळाली होती. आता त्याच्या उलट वारे फिरल्याचे दिसत आहे.
एनडीएला आंध्र प्रदेशच्या शहरी भागात 53 टक्के आणि ग्रामीण भागात 50 टक्के मते तर YSRCPला शहरी भागात 42 टक्के आणि ग्रामीण भागात 45 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला पुरुष मतदारांनी मोठी साथ दिली आहे. ५४ टक्के पुरुष मतदारांची मते मिळताना दिसत आहेत, तर ४८ टक्के महिलांची साथ मिळताना दिसत आहे.