नवी दिल्ली : वायएसआर कॉँग्रेस पार्टीचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिल्लीत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. तसेच राज्याची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी निधी देण्याचीही विनंती केली. रेड्डी यांनी मोदी यांना आपल्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.भाजपला लोकसभेत २५० जागा मिळाल्या असत्या तर परिस्थिती वेगळी असली असती तर आम्ही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या अटीवर, कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर आमच्या खासदारांचा पाठिंबा दिला असता, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.आंध्र प्रदेश मध्ये सत्ताधारी तेलगू देशम पार्टीला (टीडीपी) मात देऊन वायएसआर कॉँग्रेस पार्टीने विधानसभेच्या १५१ जागा मिळविल्या. तसेच लोकसभेच्या २३ जागांवर विजय संपादन केला आहे. केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास मनाई केली. त्यामुळे टीडीपी ने एनडीए सोबतची आघाडी संपुष्टात आणली. तर जगनमोहन रेड्डी आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्यासारख्या महत्वाच्या विषयावर निवडणूक लढले. जगनमोहन यांनी म्हटले आहे की, भाजपला आता आमची आवश्यकता नाही. आम्ही पंतप्रधानांना आपल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. मोदी यांनी रेड्डी यांच्या प्रस्तावर गंभीर विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे सुत्रांनी सांगितले.>प्रत्येक मुलाखतीत आठवण देणाररेड्डी यांनी म्हटले की, आज पंतप्रधानांशी पहिली भेट झाली. देवाची इच्छा असेल तर मी त्यांना ४०किंवा ५० वेळा सुध्दा भेटेन. प्रत्येक मुलाखतीत विशेष राज्याच्या मागणीची आठवण त्यांना करुन देईन. मावळते मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आपला काहीही विरोध नाही. आमचे सरकार क्रांतीकारी असेल. ६ महिने ते वर्षभरात आमचे सरकार क्रांतीकारी म्हणून उदाहरण दाखल होईल, याची मी खात्री देतो.
आंध्रच्या विशेष राज्याच्या दर्जासाठी जगनमोहन दिल्लीत, पंतप्रधानांशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 4:08 AM