हैदराबाद : आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यामुळे पक्ष प्रमुख जगनमोहन रेड्डी आज मुख्यमंत्रपदाची शपथ घेणार होते. कार्यक्रम स्थळावर जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र, बुधवारी रात्री आलेल्या जोरदार वादळ आणि पावसामध्ये कार्यक्रम स्थळच उद्ध्वस्त झाले आहे.
जगनमोहन रेड्डी हे आज दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी शपथ घेणार आहेत. त्यांच्या पक्षाने 175 पैकी 151 जागांवर विजय मिळविला आहे. तर लोकसभेसाठी 25 पैकी 22 जागांवर खासदार निवडून आले आहेत. रेड्डी यांच्या शपथविधीसाठी राज्यपाल नरसिंह राव बुधवारी दुपारीत हैदराबादला पोहोचले आहेत.
मात्र, बुधवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे त्यांच्या शपथविधीचे कार्यक्रमस्थळ उद्ध्वस्त झाले आहे. पेंडॉल उडून गेला असून ठिकठिकाणी लावलेले बॅनरही फाटले आहेत. तसेच सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रेड्डी हे शपथविधी पुढे ढकलतात की बंदिस्त हॉलमध्ये घेतात याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.