पुरी : ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार रविवारी उघडण्यात आले आहे. जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार उघडण्यासाठी आधीपासूनच राज्य सरकारकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. मंदिर आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. यासोबतच विविध तयारीही करण्यात आली आहे.
रत्न भांडार उघडण्यापूर्वी श्री जगन्नाथ मंदिरात विशेष पेट्या आणण्यात आल्या. रत्न भांडार उघडण्याची वेळ राज्य सरकारने १४ जुलै रोजी दुपारी १. २८ वाजता निश्चित केली होती. त्यानंतर शुभ मुहूर्त आला, जेव्हा हे रत्न भांडार उघडण्यात आले. याआधी १९७८ मध्ये रत्न भांडारचे दरवाजे उघडले गेले. त्यावेळी ३६७ दागिने सापडले होते, ज्याचे वजन ४३६० तोळे होते. त्यामुळे आता रत्न भांडारात किती खजिना आहे हे समोर येणार आहे.
ओडिशातील जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार उघडण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. न्यायमूर्ती विश्वनाथ रथ हे या समितीचे अध्यक्ष आहेत. रत्न भांडार पुन्हा सुरू करण्यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत रत्न भांडार उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्न भांडार उघडण्याचा आणि त्यामधील दागिन्यांची काळजी घेण्याचा निर्णय यावेळी घेतला गेला.
रत्न भांडारचे दरवाजे उघडण्याच्या निर्णया संदर्भात माहिती देताना समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती विश्वनाथ रथ म्हणाले की, निर्णयानुसार रत्न भांडार उघडले जाईल. त्यानंतर दोन्ही भांडारांमध्ये ठेवलेले दागिने आणि मौल्यवान वस्तू गर्भगृहाच्या आतमध्ये आधीच वाटप केलेल्या खोल्यांमध्ये नेले जातील. ही प्रक्रिया सुरु असताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. मात्र, हे एक मोठे आव्हान आहे. कारण, ४६ वर्षांपासून रत्न भांडारचा दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे आतमध्ये काय परिस्थिती आहे हे कोणालाच माहित नाही.
याचबरोबर, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे (एसजेटीए) मुख्य प्रशासक अरविंद पाधी यांनी सांगितले की, रत्न भांडारमध्ये समितीच्या सदस्य तसेच समितीने नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त कुणालाच प्रवेश देण्यात येणार नाही. मोजणी पूर्ण होईपर्यंत मंदिरात तात्पुरती प्रवेशबंदी लागू केली जाईल. फक्त सिंहद्वार गेट उघडे राहिल तर इतर सर्व दरवाजे बंद राहतील. तसेच, येथे सामान्य लोकांना प्रवेश करता येणार नाही. सर्व समिती सदस्यांची सुरक्षा तपासणी केली जाईल आणि संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल.
रत्नांचे भांडार म्हणजे काय? जगन्नाथ मंदिर हे चार धामांपैकी एक आहे, ते १२व्या शतकात बांधले गेले. या मंदिरात रत्नांचे भांडारही आहे. रत्न भांडारला देवाचा खजिना म्हणतात. या रत्न भांडारात जगन्नाथ मंदिरातील भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा या तिन्ही देवतांचे दागिने ठेवलेले आहेत. हे दागिने अनेक राजे आणि भक्तांनी वेळोवेळी देवांना अर्पण केले होते, जे रत्नांच्या भांडारात ठेवले आहेत.