नवी दिल्ली - भाजपचे नेते व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात उपराष्ट्रपतिपदाचा शपथ दिली. ‘बहुत बहुत बधाई’ अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी धनखड यांना शुभेच्छा दिल्या.
धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाची शपथ हिंदीतून घेतली. या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम. हमीद अन्सारी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. त्यामुळे धनखड यांच्याकडे राज्यसभेचीही सूत्रे आली आहेत. उपराष्ट्रपती धनखड यांनी शपथविधीआधी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या स्मृतींना वंदन केले. शपथविधीनंतर ते उपराष्ट्रपतींच्या शासकीय निवासस्थानी रवाना झाले. त्यावेळी त्यांच्या समवेत पत्नी सुदेश धनखड व कुटुंबीय होते.