नवी दिल्ली-
देशात आज राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीचीही प्रक्रिया सुरू आहे. एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. अर्ज दाखल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उमेदवार जगदीप धनखड यांनी परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण दोन्ही नेत्यांनी एकाच पद्धतीचे आणि रंगाचे कपडे परिधान केले होते. अर्थात हा योगायोग असावा. पण चर्चा तर होणारच.
खरंतर दोन्ही नेते एकमेकांशी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधताना देखील पाहायला मिळाले. मोदी आणि धनखड यांच्या अनोख्या केमिस्ट्रीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान, मोदी-धनखड यांच्या केमिस्ट्री आणि अर्ज दाखल करण्याच्या या प्रसंगावर काँग्रेसनं जोरदार टोला लगावला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक व्हिडिओ शेअर करत नेमकं उमेदवार कोण आहे? असा खोचक सवाल उपस्थित केला आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये गुफ्तगू अन् मजेशीर संवादउपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करत असताना जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गप्पा सुरू होत्या. धनखड यांचं म्हणणं मोदी नीट लक्ष देऊन ऐकताना दिसले. यावेळी अत्यंत खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं.
दोघांच्या कपड्यांचा रंगही एकचमोदी आणि धनखड यांनी परिधान केलेल्या कपड्यांनीही लक्ष वेधून घेतलं. पंतप्रधान मोदींनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि निळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं. तर धनखड यांनीही याच रंगाचे कपडे परिधान केले होते. दरम्यान, भाजपानं ज्यापद्धतीनं राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर करताना धक्कातंत्राचा वापर केला. त्याच पद्धतीनं उपराष्ट्रपतीपदासाठीही जगदीप धनखड यांना उमेदवारी घोषीत करुन विरोधकांना चकवा दिला आहे. विरोधकांकडून उपराष्ट्रपतीसाठी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसची टीकाधनखड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या व्हिडिओवर जयराम रमेश यांनी ट्विट केलं आहे. या व्हिडिओत निवडणूक अधिकारी पंतप्रधान मोदींना अर्जाबाबतची काही कागदपत्रं देताना दिसत आहेत. त्यानंतर ते उमेदवार जगदीप धनखड यांचे आभार व्यक्त करत आहेत. जयराम रमेश यांनी या व्हिडिओ ट्विट करत नेमकं उमेदवार कोण आहे? असा टोला लगावला आहे.