Jagdeep Dhankar Vice President: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला आहे. त्यांनी विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. जगदीप धनखड यांना तब्बल ५२८ मतं मिळाली तर मार्गारेट अल्वा यांच्या पारड्यात १८२ मतं पडली आहेत.
उपराष्ट्रपतीपदासाठी आज सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत मतदान झालं. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यात ७१० मतं वैध धरली गेली आणि यातील ५२८ मतं जगदीप धनखड यांना मिळाली. बहुमतानं सत्तेत असलेल्या भाजपाचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय जवळपास निश्चितच होता. त्यात तृणमूल काँग्रेसनं निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तसंच आणखी काही पक्षांनी भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे जगदीप धनखड यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला.
जगदीप धनखड यांच्या विजयानंतर भाजपा कार्यालयाबाहेर जल्लोष केला जात आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जगदीप धनखड यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या मतदानात समाजवादी पक्षाच्या २, शिवसेनेच्या २ आणि बसपाच्या एका खासदाराची अनुपस्थिती होती. तर भाजपाचे खासदार सनी देओल आणि संजय धोत्रे आरोग्याच्या कारणास्तव मतदान करू शकले नाहीत. एकूण ७२५ खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
कोण आहेत जगदीप धनखड?- जगदीप धनखड हे झुंजनू गावात एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यांची एकेकाळी राजस्थानच्या राजकारणातील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळख होती. सध्या ते पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी कार्यरत आहेत.
- राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष असलेले धनखड हे राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्व आहे. राजस्थानमधील जाटांना आरक्षण मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
- धनखड हे कायद्यावर प्रभुत्व असलेले, राजकारण, राजकीय डावपेच आणि प्रत्येक पक्षातील नेतेमंडळींशी मैत्रिपूर्ण संबंध असलेले असे व्यक्तिमत्व आहे.
- पश्चिम बंगालमध्ये मारवाडी समाजाचा विशेष प्रभाव आहे. मारवाडी समाज व्यवसाया बरोबरच राजकारणातही सक्रीय असल्यानेच त्यांना पश्चिम बंगाल मधील राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले.