अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने गुजरात किनाºयालगतच्या समुद्रात एक परकीय व्यापारी जहाज अडवून त्यातून १,५०० किलो हेरॉइन पकडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ३,५०० कोटी रुपये आहे. हे हेरॉइन तस्करीने मुंबईत आणले जाणार होते, असे समजते.संरक्षण दलाचे प्रवक्ते अभिषेक मतिमान यांनी सांगितले की, आधी मिळालेल्या पक्क्या गुप्तवार्तेवरून तटरक्षक दलाने शनिवारी दुपारी ही कारवाई केली. पकडलेले व्यापारी जहाज व त्यावरील अमली पदार्थांचा साठा पोरबंदर येथे आणण्यात आला असून तटरक्षक दल, इन्टेलिजन्स ब्युरो (आयबी), सीमाशुल्क विभाग, पोलीस आणि नौदल अशा अनेक संस्था मिळून पुढील तपास करीत आहेत. तस्करीसाठी एका जहाजातूनहेरॉईन आणले जात आहे, अशी पक्की खबर २७ जुलै रोजी मिळाल्यानंतर तटरक्षक दलाची ‘समुद्र पावक’ आणि ‘अंकित’ ही दोन गस्ती जहाजे शोधकार्यावर रवाना झाली. या जहाजांनी आणि तटरक्षक दलाच्या टेहळणी विमानांनी समुद्राच्या त्या पट्ट्यात ये-जा करणाºया प्रत्येक जहाजावर बारकाईने नजर ठेवली.अखेर शनिवारी दुपारी पनामामध्ये नोंदणी झालेल्या ‘एमव्ही हेन्री’ या छोटेखानी व्यापारी जहाजास संश्यावरून घेरून अडविण्यात आले. अधिकाºयांनी ‘हेन्री’ जहाजावर जाऊन शोध घेतला असता प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेले १,५०० किलो हेरॉईन मिळाले. हेरॉईन जप्त करून आठ खलाशांसह जहाजही ताब्यात घेण्यात आले.देशात आत्तापर्यंत तस्करीच्या मार्गाने आणताना पकडला गेलेला हेरॉईनसारख्या अंमली पदार्थांचा हा सर्वात मोठा साठा आहे. (वृत्तसंस्था).
संघटित टोळीचा संशय-हे व्यापारी जहाज नेमके कुठून आले होते हे लगेचस्पष्ट झाले नाही. तसेच हे हेरॉइन मुंबईला आणले जायचे होते, पण ते मध्येच पकडले गेले, असेही वृत्त होते. परंतु त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. कुठेही जाणार असले तरी एवढे हेरॉइन एका ठिकाणी वापरले जाणे अशक्य आहे. त्यामुळे यामागे मोठ्या तस्करी टोळीचा हात असावा हे उघड आहे. शिवाय अशाच प्रकारे याआधी पकडले न गेलेले हेरॉइनआणले गेले होते का हेही तपासातून स्पष्ट होईल.