नवी दिल्ली:दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचारात (Jahangirpuri Violence) नवा खुलासा झाला आहे. हिंसाचारादरम्यान, दंगलकोरांनी गोळीबारही केला, ज्यात एक पोलिस अधिकारी जखमी झाला. ही गोळी चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अस्लम असे या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.
काल हनुमान जन्मोत्सवानिमित्त दिल्लीतील जहांगीरपुरी भागात काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. तसेच, हिंसाचारादरम्यान अनेक वाहनांची जाळपोळही झाली. या हिंसाचारात 8 पोलिसांसह सुमारे 9 जण जखमी झाले आहेत. यादरम्यान, गोळीबार झाल्याचा खुलासाही झाला आहे. या हिंसाचाराच्या आरोपाखाली आतापर्यंत अस्मलसह 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
अन्सार नावाच्या व्यक्तीने वाद घातलाएफआयआरच्या प्रतीनुसार, हनुमान जन्मोत्सवाची मिरवणूक जहांगीरपूरच्या सी ब्लॉकमधील जामा मशिदीजवळ पोहोचली, तेव्हा अन्सार नावाचा एक व्यक्ती त्याच्या चार-पाच साथीदारांसह पोहोचला आणि मिरवणुकीत सामील असलेल्या लोकांशी वाद घालू लागला. यानंतरच वाद वाढत गेला आणि दगडफेक सुरू झाली. अटक करण्यात आलेल्या 15 जणांमध्ये अन्सारचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, अन्सारवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.
शनिवारी नेमके काय झाले?शनिवारी नवी दिल्लीतील जहांगीरपुरमध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समाजाचे लोक आमनेसामने आले. वातावरण इतके बिघडले की, वादाचे रुपांतर दंगलीत झाले. जहांगीरपुरीच्या कुशल सिनेमाजवळून हनुमान जयंतीची मिरवणूक जात असताना हा गोंधळ झाला. हिंसाचारादरम्यान अनेक वाहनांना आग लावण्यात आली. दगडफेक करणाऱ्या जमावाच्या हातात काठ्या आणि तलवारीही दिसत होत्या. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात 6 पोलिसांसह 7 जण जखमी झाले आहेत.