नवी दिल्ली - दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या दंगलीनंतर काल महानगरपालिकेने येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये एक मुलगा दुकानाच्या ढिगाऱ्यामधून काही सामान आणि नाणी गोळा करताना दिसत आहे. त्याच्या चारही बाजूंना सामान आणि पाडलेला ढिगारा दिसत आहे. एका रिपोर्टरने हे सामान का गोळा करत आहेस असे विचारले असता हा मुगला म्हणाला की, या सामानामधूनच आमचं दुकान आणि घर चालत होतं. जाणून घेऊयात कोण होता हा मुलगा?
हा फोटो दिल्लीतील जहांगिरपुरी येथील आहे. येथे हनुमान जयंतीदिवशी दंगल झाली होती. त्यानंतर एमसीडीने हिंसा झालेल्या ठिकाणावरील अनधिकृत बांधकामे आणि अवैध मालमत्तांवर बुलडोझर चालवला. काल सकाळपासून या कारवाईला सुरुवात झाली. यामध्ये रस्त्यावरील गाडे, दुकानदारांनी दुकानांसमोर केलेलं वाढीव अवैध बांधकाम तोडण्यात आले. या कारवाईनंतर अनेक दुकानदार या दुकानांमधून सामान गोळा करत होते. दरम्यान, आशिफ नावाचा एक छोटा मुलगा त्याचा तुटलेल्या दुकानामधून सामान आणि पैसे गोळा करत होता. त्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, या सामानामधून आमचं दुकान आणि घर चालायचं. मा शाळेत जातो आणि घरामध्ये काम करतो. एमसीडीच्या कारवाईमध्ये आशिफचे वडील अकबर यांचं दुकानही तुटलं होतं.
आशिफची आई रहिमा हिने सांगितलं की, फुटपाथवरील ठेलेवाल्यांना एमसीडीने व्हेंडरचे प्रमाणपत्र दिले होते. आम्हाला कुणीही हटवणार नाही असे सांगितले होते. मात्र असे असूनही नोटीस न देता. आमची दुकानं तोडण्यात आली. अकबर यांनी सांगितले की, जेव्हा एमसीडीने त्यांना परवाना दिला तेव्हा त्यांनी दुकानात फ्रिज लावला होता. मात्र बुलडोझरने सारे काही तोडले. यात एकूण ८० हजार रुपयांचं नुकसान झालं आहे.