मुंबई - देशभरात 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे, कोरोना महामारीनंतर प्रथमच तिरंग्याला सलामी देण्यासाठी देशवासीय एकत्र येत आहेत. कोरोनाच्या सावटामुळे यंदाचाही कार्यक्रम कमी लोकांमध्येच साजरा होत आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणेच उत्साह आणि देशभक्तीमय वातावरण देशभर पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळीच ट्विट करुन देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशवासीयांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! जय हिंद... असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. देशभरात गावपातळीपासून ते दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत तिरंगा ध्वज फडकावून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. दिल्लीच्या राजपथावरही परेडचा मोठा सोहळा पार पडणार आहे. कोरोनामुळे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, भारतीय सैन्य दलाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच भारतीय संचलनात राफेल या अत्याधुनिक लढाऊ विमानांसह टी -90 रणगाडे, समविजय इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, सुखोई -30 एमकेआय लढाऊ विमानांसह आपल्या सैन्य शक्तीचे प्रदर्शन करेल.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राजपथावर १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ, संरक्षण मंत्रालयाचे सहा चित्ररथ, इतर केंद्रीय मंत्रालये आणि निमलष्करी दलाच्या ९ चित्ररथांसह ३२ चित्ररथांद्वारे देशातील समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि सैन्याच्या शक्तीचा शानदार झलक दिसून येईल. 'शालेय विद्यार्थी लोकनृत्य सादर करतील. कालाहांडीचे मनमोहक लोकनृत्य बजासल, फिट इंडिया मूव्हमेंट आणि स्वावलंबी भारतासाठी मोहिमेची झलकही दिसून येईल.
119 जणांना पद्म पुरस्कार
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज एकूण 119 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये 7 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 102 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
शिंजो आबे हे जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेले पहिलेच पंतप्रधान आहेत. भारत आणि जपान यांच्यातील संबंध वृद्धिगंत करण्यास शिंजो आबे यांचा मोठा वाटा आहे. तसेच, 2017 मध्ये जपानचे पंतप्रधान असताना शिंजो आबे हे भारतात आले होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. शिंजो आबे यांची गळाभेट घेत नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत केले होते.