मुंबई - महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची महापूजा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी, लाखोंचा जनसागर भीमातिरी जमला आहे. काय हे रिंगण.. काय हा पाऊस... काय ही गर्दी... आणि काय हा वारकऱ्यांचा उत्साह... असा दैदिप्यमान सोहळा, वैष्णवांचा मेळा पंढरपूरात जमला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरात येत आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पत्र पाठवून वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... या आमदार शहाजीबापू पाटील यांचा संवाद मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या संवादाची भुरळ आषाढी यात्रेच्या निमित्ताने आलेल्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील वारकऱ्यांनाही झाल्याचं दिसून आलं. वारकऱ्यांच्या तोंडी शुक्रवारी हा डायलॉग पुन्हा ऐकावयास मिळाला. वारीत वातावरण भक्तीमय झालं असून पांडुरंगाच्या ओढीने लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरात पोहोचले आहेत. या वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनही कामाला लागलं आहे. तर, स्वयंसेवी संस्थाही पुढाकार घेत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आषाढीच एकादशीनिमित्त वारकरी आणि भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. जय जय रामकृष्ण हरी.. असे म्हणत मोदींनी आषाढीचं महत्त्वही समजावून सांगितलं आहे.