नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी खासदारकीची शपथ घेतली. शपथेसाठी ते जेव्हा आसनावरून उठले तेव्हा भाजपाच्या सदस्यांनी जय श्रीराम आणि वंदे मातरमचे नारे देण्यास सुरुवात केली. यावर ओवेसी यांनी हात उंचावत अजून जोरात असा इशारा केला. तसेच शपथ घेतल्यानंतर ओवेसींना जय भीम आणि अल्लाह-हू-अकबरचा नारा दिला.
संसदेच्या नवनियुक्त सदस्यांना खासदारकीची शपथ देण्यात येत आहे. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली शपथ घेतली. यानंतर सायंकाळी राहुल गांधी यांनी शपथ घेतली. यावेळी भाजपाच्या सदस्यांनी जय श्री रामचे नारे दिले होते. आजही ओवेसी शपथ घेण्यासाठी उठले असता पुन्हा घोषणाबाजी सुरु करण्यात आली. यावेळी ओवेसींनी वातावरण शांत राहण्यासाठी त्यांना प्रत्युत्तर न देता इशाऱ्याने अजून जोरात असे हातवारे केले. यानंतर त्यांनी शपथ घेतली आणि शेवटी जय भीम आणि अल्लाह-हू-अकबरचा नारा दिला.
यंदाचे वेगळेपणनवनियुक्त खासदार शपथ घेत असताना अनेकांचा वेगळेपणा दिसून आला. मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूरने शपथ घेतल्यानंतर भारत माता की जयचा नारा दिला. तर आपचे पंजाबचे खासदार भगवंत मान यांनी इन्कलाब जिंदाबादचे नारे दिले. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. तर केरळातील काँग्रेसचे खासदार सुरेश यांनी हिंदीमध्ये शपथ घेत सर्वांना आश्चर्यचकित केले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.