कोलकाता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. तसेच, त्यांनी ही गर्दी एका खास पार्टीची असल्याचा आरोप भाजपावर केला आहे.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध दर्शविला. 'मला वाटते की, सरकारच्या कार्यक्रमात काही मोठेपण असले पाहिजे. हा राजकीय कार्यक्रम नाही. एखाद्याला आमंत्रण केल्यानंतर अपमान करणे आपल्याला शोभा देत नाही,' असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
याचबरोबर, ममता बॅनर्जी यांनी या कार्यक्रमात काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मी निषेध म्हणून काहीही बोलणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान अनेक कलाकारांनी सादरीकरण केले. तसेच, नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी एका पोस्टल स्टॅम्पचेही अनावरण करण्यात आले.
शनिवारी कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 7 किमी लांबीच्या रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला. "ज्यावेळी निवडणुका होतात, त्याचवर्षी आम्ही नेताजींची जयंती साजरी करत नाही. आम्ही नेताजींची 125 वी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत. नेताजी हे देशातील महान स्वातंत्र्यसेनानी होते. ते एक महान तत्वज्ञ होते," असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच, ममता बॅनर्जी यांनी ट्विटद्वारे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद फौज यांच्या नावाने अनेक विकासकामांची घोषणा केली आहे.