सूरत- दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या पद्मावती या सिनेमासमोरील संकटं काही कमी होताना दिसत नाही. या सिनेमाचं शूटिंग सुरु झाल्यापासूनच सेटवर करण्यात आलेली तोडफोड, जाळपोळ हे सगळे प्रकार आधी घडले होते. त्यानंतर आता एका कलाकाराने काढलेली ‘पद्मावती’च्या पोस्टरची रांगोळी काही जणांनी पुसून टाकली.
करण के या कलाकाराने दीपिका पदुकोणच्या ‘पद्मावती’ लूकमधील रांगोळी काढली होती. या रांगोळीसाठी त्याला तब्बल ४८ तास लागले होते. पण, समाजकंटकांनी अवघ्या काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं करून टाकलं. ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, करण हा एक अभिनेता, लेखक आहे. तसेच तो डॉक्टरकीचे प्रशिक्षणही घेतो आहे. १०० लोकांच्या एका घोळक्याने ‘जय श्री राम’च्या घोषणा देत माझ्या कित्येक तासांच्या मेहनतीवर पाणी फिरवल्याचं करणने ट्विट करून म्हंटलं आहे. त्याने दोन फोटो ट्विट केले असून, एका फोटोत पद्मावतीची सुंदर रेखाटलेली रांगोळी दिसते. तर दुसऱ्या फोटोत ती रांगोळी विस्कटल्याचं पाहायला मिळतं आहे.
पद्मावती सिनेमाची घोषणा केल्यापासूनच त्यात काही ना काही अडथळे येत आहेत. राजस्थानमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरु असताना राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेटवर तोडफोड केली होती. इतकंच नाही तर त्यांनी संजय भन्साळी यांच्या कानशिलातही लगावली होती. त्यानंतर सिनेमाच्या शूटिंगची जागा बदलूनही पुन्हा करणी सेनेकडून दोनदा तोडफोड करण्यात आली. रणवीरने ‘पद्मावती’चे पोस्टर शेअर केल्यानंतरही त्याला धमकी देण्यात आली होती. आमचं सिनेमावर पूर्ण लक्ष असून, त्यात काही चुकीचं आढळल्यास आम्ही तुमच्या वाटेत पुन्हा अडथळे निर्माण करू, असं त्यांनी म्हटलं.