नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये राजककीय वातावरण कमालीचे तापले होते. त्यातच बंगालमध्ये मुसंडी मारण्याच्या इराद्याने उतरलेल्या भाजपाने जय श्रीराम हा नारा देत बंगालमधील सत्ताधार असलेल्या तृणमूल काँग्रेसला जेरीस आणले होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम हा वादाचा मुद्दा बनला असून, या वादात आता प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी उडी घेतली आहे. जय श्रीराम या घोषणेचा बंगाली संस्कृतीशी काहीही संबंध नाही. या घोषणेचा वापर केवळ लोकांना मारहाण करण्यासाठी होत आहे, असा आरोप अमर्त्य सेन यांनी केला आहे. शुक्रवारी जादवपूर विद्यापीठामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना अमर्त्य सेन यांनी जय श्रीराम या घोषणेवरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले. ''आता कोलकात्यामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होताना दिसतो. पूर्वी तो होत नसे. सध्या जय श्रीराम ही घोषणा लोकांना मारहाण करण्यासाठी उपयोगात आणली जात आहे.'' दरम्यान, जय श्रीराम या घोषणेचा वापर भाजपाकडून सांप्रदायिक ध्रुवीकरण करण्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपाकडून जय श्रीराम या घोषणेचा प्रभावी वापर करण्यात आला होता. तसेच काही ठिकाणी जय श्रीराम अशी घोषणा देणाऱ्यांविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली होती. अमर्त्य सेन यांनी पुढे सांगितले की, ''एकदा मी माझ्या चार वर्षीय नातीला विचारले की, तुझी आवडती देवी कोण आहे. त्यावर तिने दुर्गा माता असे उत्तर दिले. बंगालमध्ये दुर्गा मातेला जे महत्त्व आहे त्याची तुलना रामनवमीशी होऊ शकत नाही. दुर्गामाता आमच्या जीवनात उपस्थित आहे. तर जय श्रीराम सारख्या घोषणा केवळ लोकांवर हल्ला करण्यासाठी आडोसा म्हणून दिल्या जातात असे मला वाटते.''
'जय श्रीराम' चा बंगाली संस्कृतीशी काहीही संबंध नाही - अमर्त्य सेन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 11:20 AM