राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांचं आज पहाटे निधन झालं. दहा वर्षांपूर्वी, २००८ मध्ये औरंगाबाद इथं राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा महोत्सव झाला होता. त्यात धार्मिक, सामाजिक, राजकीय विषयांवर गुरू-शिष्यांमध्ये प्रश्नोत्तरं रंगली होती. शिष्यांच्या प्रश्नांना मुनीश्रींनी दिलेली उत्तरं आणि त्यांच्या मार्मिक टिप्पण्यांमधून त्यांच्या अलौकिक ज्ञानाची प्रचिती सगळ्यांनाच आली. या प्रश्नोत्तरांतील काही अंश...
गुरुदीक्षा का घेतली जाते?>> जगात आकर्षण खूप आहे. त्यात भरकटत जाऊ नये म्हणून प्रत्येकाने 'लाईन ऑफ कंट्रोल' आखणे गरजेचे आहे. त्यासाठी गुरुदीक्षा घेणे आवश्यक असून गुरूमुळे जीवन सुरक्षित होते.
दररोज भजन कशासाठी?>> दररोज भजन कशासाठी, असा प्रतिसवाल विचारत मुनीश्री म्हणाले की, भोजन शरीरासाठी आवश्यक आहे, तसेच आत्म्यासाठी भजन करणे आवश्यक आहे.
'ध्यान' काय आहे?>> साऱ्या विचारांना विसरून जाणे हेच 'ध्यान' आहे.
देशासमोरील सर्वात मोठी समस्या कोणती?>> अल्पसंख्याकवाद व बहुसंख्याकवाद हीच देशासमोरील मोठी समस्या आहे. एक वर्षासाठी हा वाद विसरा. देशांत क्रांती घडेल.
आतंकवादाचे निदान काय?>> अनेकांतवाद आतंवादाचे निदान आहे.
आपणास कोणत्या गोष्टीची चिंता वाटते?>> डॉलर व रुपयांची किंमत कमी होत आहे, याची मला चिंता नाही. मात्र माणसातील माणुसकी कमी होत आहे, याची मला चिंता आहे.
समाजात काही संत क्षेत्रवाद करीत आहेत...>> जो समाजाला जोडतो तोच खरा संत. समाजाला तोडणाऱ्याला संत म्हणता येत नाही.
मांसाहारी लोकांसाठी आपण कोणता सल्ला द्याल?>> मांसाहार करणाऱ्यांच्या पोटात जनावरांचे अवशेष असतात. ते आपल्या पोटाला स्मशानभूमी बनवतात. मांसाहार करणाऱ्यांनी संकल्प करावा की, आयुष्यभर शाकाहार करणार नाही. मांसाहाराच्या बळावर कोणीही जिवंत राहू शकत नाही. पाणी शाकाहारी आहे, मसाले शाकाही आहेत तसेच श्वासही शाकाहारी आहे. श्वास घेतला नाही तर जिवंत कोणी राहू शकत नाही.
भूत आहे हे आपण मानता का?>> मी भूतकाळ मानतो, वर्तमानकाळ व भविष्यकाळही मानतो.
मुनीश्री आपण एवढे कठीण जीवन का जगता?>> जगाला प्रकाश देण्यासाठी दिव्याला जळावे लागते तसेच आमचे जीवन आहे.
दिगंबर, श्वेतांबर एक होऊ शकतील?>> जैन धर्मात पंथ वेगवेगळे असले तरी त्यांचे आराध्य तीर्थंकर एकच आहेत. पंच महाव्रत, महामंत्र एकच आहे. दिगंबर, श्वेतांबर जैन एक होऊ शकतात. दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथीसारख्या शब्दांना एक वर्षासाठी कचऱ्याच्या डब्यात टाका. जैन म्हणून जगा.