Jain Muni Acharya Vidyasagar Maharaj : देशातील प्रसिद्ध जैन मुनी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज (Jain Muni Acharya Vidyasagar Maharaj) यांचे रविवार(दि.18) रोजी रात्री 2:35 वाजता निधन झाले. छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथील ‘चंद्रगिरी तीर्थ’ येथे 'सल्लेखना'द्वारे त्यांनी देहत्याग केला. यानंतर डोंगरगड येथील चंद्रगिरी पर्वतावरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. विद्यासागर महाराजांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला. तसेच, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अर्ध्या दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आचार्य विद्यासागर महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, दिल्लीत आयोजित भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पंतप्रधान मोदी, सर्व केंद्रीय मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपस्थित पक्षाच्या इतर सर्व नेत्यांनी विद्यासागरजी महाराज यांच्यासाटी दोन मिनिटांचे मौन पाळले.
यावेळी पंतप्रधान म्हणाले, “माझ्या संवेदना आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या असंख्य भक्तांसोबत आहेत. अध्यात्मिक प्रबोधनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांनी केलेले अमूल्य योगदान, आरोग्य सेवेसाठी केलेले कार्य, यासाठी येणाऱ्या पिढ्या त्यांना कायम स्मरणात ठेवतील." दरम्यान, गेल्या वर्षी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी डोंगरगड येथे विद्यासागर महाराज यांची भेट घेतली होती.
छत्तीसगड-MP च्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावनाआचार्य विद्यासागर महाराज यांच्या निधनाबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी X वर लिहिले- "परम पूज्य संत 108 आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांचे निधन ही जैन समाजाची आणि राष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी आहे." तसेच, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव सहाय म्हणाले - "आचार्य विद्यासागर महाराज यांचे देश आणि समाजासाठी केलेले कार्य युगानुयुगे स्मरणात राहील."
काय आहे 'सलेखना' पद्धत ?चंद्रगिरी तीर्थने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'सल्लेखना' ही जैन धर्मातील एक प्रथा आहे. यामध्ये अन्न-पाणी सोडून शरीराचा त्याग केला जातो. जैन मुनी आणि आचार्य 'सल्लेखना'द्वारे देह सोडतात. आचार्य विद्यासागर जी महाराज यांनीदेखील गेल्या तीन दिवसांपासून अन्न-पाणी सोडले होते.