नवी दिल्ली: जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजारानं नवी दिल्लीत निधन झालं आहे. ते 51 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे देशभरातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरू होत्या. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक कुप्रथांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे मुनी अशी तरुण सागर यांची ओळख होती.
पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला. मध्यरात्री 3 वाजता त्यांचं निधन झालं. अतिशय कडव्या विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच तरुण सागर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजताच त्यांच्या लाखो अनुयायांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तरुण सागर यांच्यावर आज दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले जातील.