गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये कहर केला आहे. शहरातील रस्ते, विमानतळ, रेल्वे स्थानक, पोलीस ठाणे, रुग्णालयासह प्रत्येक ठिकाणी पाणी साचलं आहे. पावसामुळे दिल्लीसारखी दुर्घटना जयपूरमध्येही घडली आहे. विश्वकर्मा परिसरात पावसाच्या पाण्याने बेसमेंट भरल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन बेसमेंटमधील पाणी बाहेर काढत आहे.
दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर भागात असलेल्या कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच जयपूरच्या विश्वकर्मा भागातील बेसमेंट पावसाच्या पाण्याने भरलं होतं. ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या याबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. बेसमेंटमधून पाणी काढल्यानंतरच मृतांची ओळख पटणार आहे.
दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर येथे असलेल्या RAU'S IAS कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये बांधलेल्या लायब्ररीत विद्यार्थी शिकत होते. त्याचवेळी मुसळधार पाऊस झाल्याने कोचिंग सेंटरच्या बाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. याच दरम्यान अचानक बेसमेंटमध्ये अवघ्या काही मिनिटांत दहा ते बारा फूट पाणी भरलं.
ही घटना घडली तेव्हा परीक्षेची तयारी करणारे सुमारे ३५ विद्यार्थी बेसमेंटमध्येशिकत होते. या माहितीनंतर दिल्ली अग्निशमन सेवा आणि एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तीन विद्यार्थ्यांना वाचवता आले नाही. या दुर्घटनेनंतर दिल्लीतील बेसमेंटमध्ये चालणाऱ्या सर्व कोचिंग सेंटरला टाळं ठोकण्यात आलं आहे.