Jaipur Bomb blast Case, High Court: जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही दोषींना राजस्थान उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणातील मृत्यू संदर्भासह दोषींनी सादर केलेल्या 28 अपीलांवर न्यायालयाने आज निकाल दिला. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने दोषींचे अपील मान्य करताना, त्यांच्या बाजूने दिलासा देणारा निर्णय दिला. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पंकज भंडारी आणि न्यायमूर्ती समीर जैन यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निकाल दिला. उच्च न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरवलेल्या अल्पवयीन मुलाचे प्रकरण ज्युवेनाईल बोर्डाकडे पाठवले आहे, तसेच इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
कनिष्ठ न्यायालयाने ठरवले होते दोषी
याआधी 2019 मध्ये जयपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने जयपूर बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल देताना या प्रकरणातील चार आरोपींना दोषी ठरवले होते. आरोपींना UAPAच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. त्याच वेळी न्यायालयाने एका आरोपीची निर्दोष मुक्तताही केली होती. वास्तविक या प्रकरणात पाच आरोपी होते. 2019 मध्ये जेव्हा कनिष्ठ न्यायालयाने सुनावणी केली तेव्हा त्यापैकी चार दोषी आढळले, तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
2019 मध्ये न्यायालयाने या प्रकरणात आरोपी शाहबाज हुसेनची निर्दोष मुक्तता केली होती. तर मोहम्मद सैफ, सरवर आझमी, सैफुर रहमान आणि एका अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.
2008 मध्ये झाला होता जयपूरमधील बॉम्बस्फोट
2008 मध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटानंतर राजस्थान सरकारने आरोपींना पकडण्यासाठी दहशतवादविरोधी पथक (ATS) स्थापन केले होते. या प्रकरणात जयपूरमधील चांदपोल हनुमान मंदिर, संगानेरी गेट हनुमान मंदिरासह अनेक ठिकाणी स्फोट झाले.
जयपूर मालिका स्फोट काय आहे?
13 मे 2008 रोजी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सीरियल बॉम्बस्फोट झाले होते. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या 8 बॉम्बस्फोटांनी संपूर्ण जयपूर हादरून गेला होता. या घटनेत 71 जणांना आपला जीव गमवावा लागला असून सुमारे 176 जण जखमी झाले. जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणात ATS ने 11 दहशतवाद्यांची नावे दिली होती. या प्रकरणी एटीएस राजस्थानने पाच आरोपींना अटक केली होती. त्याचवेळी हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेललाही एका दहशतवाद्याला अटक करण्यात यश आले. त्याचवेळी तीन आरोपी बराच काळ फरार होते तर दोन आरोपींचा मृत्यू झाला.