राजस्थानमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. १ एप्रिलपासून राजस्थानमधील शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे. सरकारने लोकांना मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री मोफत वीज योजना आजपासून सुरू होत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य झाल्याचा दावा केला जात आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य वीजग्राहकांनाही आजपासून १०० युनिट मोफत वीज मिळणार आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात याची घोषणा केली होती. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या वीज बिलात नागरिकांना दिलासा मिळण्यास सुरुवात होणार आहे. राज्यातील सुमारे १ कोटी ४० लाख सर्वसामान्य ग्राहकांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. शेतकऱ्यांसोबतच ८० टक्के सर्वसामान्य वीजग्राहकांनाही शून्य वीजबिल येत असल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वी राजस्थानमध्ये सर्वसामान्य ग्राहकांना ५० युनिट वीज मोफत दिली जात होती.
... जेव्हा IAS अधिकारी सौम्या वृद्धाची समस्या ऐकण्यासाठी रस्त्यावर बसतात
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या घोषणेनुसार, आजपासून महिलांना बसच्या भाड्यात पन्नास टक्के सवलत मिळणार आहे. आजपासून राजस्थान रोडवेजमधील महिलांचे भाडे निम्मे होणार आहे. यापूर्वी महिलांना भाड्यात ३० टक्के सूट मिळत होती. सीएम गेहलोत यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ही सूट पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवली होती.
या दोन मोठ्या योजनांव्यतिरिक्त, रोडवेज आजपासून जयपूर आणि दिल्ली दरम्यान स्लीपर बस सेवा सुरू करत आहे. आतापर्यंत फक्त खाजगी बस ऑपरेटर जयपूरहून स्लिपर बस चालवत असत. रोडवेजने ३१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजल्यापासून ही बस सुरू केली आहे. त्यामुळे जयपूर-दिल्ली कनेक्टिव्हिटी चांगली झाली आहे. यासोबतच राजस्थानमध्ये आजपासून किमान आधारभूत किमतीवर हरभरा आणि मोहरीची खरेदी सुरू झाली आहे. सहकार विभागाकडून ६३४ केंद्रांवर हरभरा व मोहरीची खरेदी सुरू आहे. यासाठी राज्यभरात ९४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.