कधी कोणावर कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. सध्या सगळे जण कोरोनामुळे हैराण झाले आहेत. उद्योग व्यवसाय बंद पडल्यामुळे दोन वेळचे अन्न आणायचे कुठून असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. सारेच उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना खर्चाचा भार उचलण्यासाठी सध्या तारेवरची कसरत करावी लागत आहे.
राजस्थानमध्ये राहणारे हुकुमचंद सोनी यांनी यावर तोडगा शोधून काढला आहे. सोनी यांचा सोने चांदीचा व्यापार आहे. रोज लाखोंची उलाढाल या व्यवसायात व्हायची. मात्र कोरोना संकटामुळे आज त्यांच्यावर भाजीपाला विकण्याची वेळ आणली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीतून तरी पैसे मिळतील आणि त्यातून कुटुंबाचा घरखर्च चालेल या हेतूने सोनी यांनी त्यांच्या दागिन्यांच्या दुकानात भाजी विकण्यास सुरूवात केली आहे.
लॉकडाऊनमध्ये लोकांना जीवनावश्यक वस्तूचींच सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे सोने व्यापाऱ्यांवर दुकानं बंद करून घरी बसण्याची वेळ आली आहे. घरी बसून पोट कसे भरणार हा मोठा प्रश्न सोनी यांनाही भेडसावत होता. त्यामुळे दुकान बंद करण्यापेक्षा त्यांनी सोन्याच्या दुकानात भाजी विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दुकानातून लोक मोठ्या संख्येने भाजी विकत घेत आहेत. त्यामुळे सोनी यांचा चरितार्थ चालत आहे.