जयपूरच्या महापौरांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जयपूर नगरपालिकेच्या (ग्रेटर) महापौर डॉ. सौम्या गुर्जर (Jaipur Nagar Nigam (Greater) Mayor Dr Somya Gurjar) या गुरुवारी बाळंत झाल्या. पण महत्वाची बाब अशी की त्या बाळंत होण्याच्या अवघ्या काही तास अगोदरपर्यंत ऑफीसमध्ये उपस्थित राहून आपलं दैनंदिन काम करत होत्या. या माध्यमातून त्यांनी "कर्म हीच पूजा" असल्याचं सिद्ध करुन दाखवलं आहे. गुर्जर यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
डॉ. सौम्या गुर्जर यांनी गुरुवारी पहाटे ५ वाजून १४ मिनिटांनी एका मुलाला जन्म दिला. पण त्याआधी बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्या काम करत होत्या. सौम्या यांनी ट्विटकरुन याबाबतची माहिती दिली आहे. "कर्म हीच पूजा आहे! रात्री उशिरापर्यंत पालिकेत मिटिंग सुरू होती. प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर रात्री १२.३० वाजता कुकुन हॉस्पीटलमध्ये भरती झाले आणि पहाटे ५.१४ वाजता देवाच्या कृपेनं एका मुलाला जन्म दिला. मी आणि मूल दोघंही सुखरूप आहेत", असं ट्विट सौम्या यांनी केलं आहे.
सौम्या गुर्जर यांच्या ट्विटला तब्बल १० हजार पेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत आणि ट्विटरकर त्यांना शुभेच्छा देत आहेत. तसंच कामाप्रतीच्या समर्पित भावनेचं कौतुक केलं जात आहेत.