जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. याठिकाणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अपघातानंतर दाखल झालेल्या तरुणाला दुसऱ्या ग्रुपचं रक्त दिलं. यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे प्रकरण उजेडात येताच सरकारने दखल घेत चौकशीचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, बांदीकुई शहरातील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय सचिन शर्माचा कोटपुतली शहरात अपघात झाला, त्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर सचिनला जयपूर येथील सरकारी सवाई मानसिंह (एसएमएस) रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
एसएमएस हॉस्पिटलचे अधीक्षक अचल शर्मा यांनी सांगितलं की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास समिती स्थापन करण्यात आली आहे. तपास अहवालानुसार कारवाई केली जाईल. या प्रकरणात एका अधिकाऱ्याने सांगितले की, चुकीच्या ग्रुपचं रक्त चढवल्यामुळे रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि त्याला डायलिसिसवर ठेवण्यात आले, परंतु रुग्णाची प्रकृती अधिकच खालावली.
या अपघातात सचिनचं खूप रक्त गेलं होतं. याबाबत डॉक्टरांनी सचिनला रक्त चढवण्यास सांगितलं. सचिनला AB पॉझिटिव्ह रक्त हवे होते, पण वॉर्डबॉयने त्याला दुसऱ्या रुग्णाच्या O पॉझिटिव्ह' रक्ताची स्लिप दिली. यानंतर जेव्हा सचिनला AB+ ऐवजी O+ रक्त देण्यात आले, तेव्हा त्याची प्रकृती अधिकच बिघडू लागली.
सवाई मानसिंह (एसएमएस) रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल सचिन शर्माचा आज मृत्यू झाला. यानंतर सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णालयाचे अधीक्षक राजीव बगरट्टा यांनी सांगितले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. ही बाब उघडकीस आली, त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही कालच एक समिती स्थापन केली. सर्व विषयांची चौकशी सुरू आहे.