'ईडीकडे प्रश्नच नव्हते, सोनिया कितीही वेळ चौकशीस तयार होत्या', काँग्रेस नेत्याचा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 06:18 PM2022-07-21T18:18:22+5:302022-07-21T18:19:23+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आजच्या ईडीच्या चौकशीबाबत मोठा दावा केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आजच्या ईडीच्या चौकशीबाबत मोठा दावा केला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडे आज सोनिया गांधी यांना विचारण्यासाठी कोणतेच प्रश्न नव्हते. सोनियांनी चौकशी पुढे ढकलण्यासाठी कोणतंच निवेदन दिलेलं नाही, समाजमाध्यमांमध्ये याबाबतच्या अफवा पसरवल्यात जात आहेत, असं जयराम रमेश यांनी सांगितलं.
ईडीच्या दिल्लीतील कार्यालयात आज सोनिया गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी हजेरी लावली. यात काही तासांनी सोनिया गांधी बाहेर देखील आल्या. सोनिया गांधींकडून यावेळी ईडीला तब्येतीचं कारण देत चौकशी पुढे ढकलण्यासाठी आणि लवकर संपवण्यासाठीचं निवेदन केलं. ते ईडीनं स्वीकारलं असं वृत्त प्रसारित केलं जात होतं. त्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे.
"ईडीनं म्हटलं की आमच्याकडे कोणतेच प्रश्न नाहीत. तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं. पण सोनियांनी स्वत: तुम्हाला मला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारा मी रात्री ८-९ वाजले तरी चालतील मी तयार आहे असं म्हटलं. चौकशी संपवण्यासाठी सोनियांनी कोणत्याही प्रकारचं निवदेन ईडीला दिलेलं नाही हे मी स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो. ईडीच्या सुत्रांकडून चालवल्या जाणाऱ्या या संदर्भातील बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही", असं जयराम रमेश म्हणाले.
ED ने कहा हमारे पास कोई सवाल नहीं, आप जा सकती हैं, मगर सोनिया जी ने कहा कि आपके जितने सवाल हैं, पूछिए, मैं रात 8-9 बजे तक रुकने को तैयार हूं।
— Congress (@INCIndia) July 21, 2022
मैं साफ कर दूं कि सोनिया जी ने पूछताछ खत्म करने का कोई निवेदन नहीं किया : श्री @Jairam_Ramesh#सत्य_साहस_सोनिया_गांधीpic.twitter.com/vgb9XaO76C
जवळपास तीन तास चौकशी
नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी निगडीत मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये सोनिया गांधी यांची आज ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोनिया यांची जवळपास तीन तास चौकशी केली. दुपारी जवळपास साडेबाराच्या सुमारास चौकशीला सुरुवात झाली. सोनियांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशभर निदर्शनं करण्यात आली. अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज तीन तासांच्या चौकशीनंतर सोनिया गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या.