Madhya Pradesh vaccination record: केंद्र सरकारनं आता १८ वर्षांवरील सर्वांचंच मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ जूनपासून देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहीम राबवण्यात आली. यादरम्यान, मध्यप्रदेशनं सोमवारी लसीकरणाचा विक्रम करत (Madhya Pradesh vaccination record) एका दिवसात १६.४१ लाख नागरिकांना लस देण्यात आली. यापूर्वी मध्यप्रदेशा लसीकरण मोहीम धीमी करण्याचेही आरोप करण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी यासंदर्भात ट्वीट करत टीका केली आहे.
"मध्य प्रदेशात गेल्या तीन दिवसांतील लसीकरणाचा ट्रेंड : २० जून - ६९२, २१ जून - १६.९३ लाख आणि २२ जून - ४८४२. आपण कोणाला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहोत," अशा आशयाचं ट्वीट जयराम रमेश यांनी केलं आहे.
मध्यप्रदेशात २१ जून रोजी लसीकरणात पहिलं स्थान प्राप्त करत एका दिवसात सर्वाधिक नागरिकांचं लसीकरण केलं होतं. एका दिवसांत १० लाख नागरिकांच्या लसीकरणाचं ध्येय ठरवण्यात आलं होतं. परंतु सोमवारी राज्यानं तब्बल १७ लाखांच्या जवळचा आकडा गाठला. दरम्यान, जे राज्य एका दिवसांत १७ लाखांच्या जवळपास लसी देऊ शकतं त्या राज्यानं एका दिवसापूर्वी ६९२ डोस दिले, असं का करण्यात आलं, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देत वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी कोणत्याही प्रकारे यात गडबड झाली नसल्याचं सांगितलं. आम्ही १४,५०० केंद्रांवर लसीकरण केलं होतं. परंतु चूक करण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचं ते म्हणाले.