ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. २५ - नववर्षाच्या सुरूवातीलाच भारतातील पंजाबमधील पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'च्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात ७ हून अधिक जवान शहीद झाले. पुरेसे पुरावे मिळूनही पाकिस्तानने या हल्ल्यास जबाबादार असणा-या दहशतवादी संघटनेवर कोणतीही कारवाई केलेली नाही. या हल्ल्याची तीव्रता अद्याप कायम असतानाच भारतात पठाणकोट हल्ल्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जैश-ए-मोहम्मद' दशतवादी संघटनेच्या सूचनेवरून दहशतवादी स्लीपर सेल्सनी उत्तर भारतातील ठिकाणांची रेकी करण्यास सुरूवात केली असून भारतात पुन्हा पठाणकोट व गुरूदासपूरसारखे आत्मघाती हल्ले करण्याचा कट रचला जात आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) व इंडियन मुजाहिद्दीनच्या काही दहशतवाद्यांच्या मदतीने हा हल्ला करण्यात येणार असल्याचे समजते.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, लष्कराच्या गुप्तचर विभागाने पंजाब सरकारला दिलेल्या अहवालात याप्रकरणी तपशीलवार माहिती नमूद करण्यात आली असून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या अहवालानुसार, ' जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अवैस मोहम्मद हा मलेशियाला जाणार असून, तेथे त्याला बनावट मलेशियन पासपोर्ट देण्यात येणार आहे. त्या आधारे तो भारतात प्रवेश करून हल्ले घडवून आणू शकेल. पाकिस्तानमधील ओकारा येथे राहणा-या अवैसवर भारतातील हल्ल्यांवर नजर ठेवण्याची कामगिरी सोपवण्यात आली आहे,' असेही अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते.
दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे तपास पथक पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतात येऊन गेले होते. त्यानंतर १८ मे रोजी पंजाब सरकारकडे लष्करी विभागाने हा अहवाल सुपूर्त करत पुन्हा हल्ला होण्याची शक्यता वर्तवल्याचे समजते. या नव्या हल्ल्यांच्या आखणीसाठी 'जैश-ए-मोहम्मद'ने (जेईएम) पाकिस्तानच्या पंजाब व खैबर पक्थुनख्वा येथे तीन नवीन कार्यालये उघडली आहेत, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ' कोहत व हाजरा भागात जैश-ए-मोहम्मद आपली कार्यालये व नेटवर्क पुन्हा भारत असून, भरती प्रकियाही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच बालकोट येथे जैश-ए-मोहम्मद संघटनेतर्फे (अतिरेकी हल्ले व कारवायांसाठी) नवी प्रशिक्षण व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे' असेही अहवालात म्हटले आहे.