ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 05 - जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी दिल्लीतील एअरबेस तसंच दिल्ली गाजियाबाद सीमारेषेवरील मॉलवर हल्ला करण्याच्या तयारीत होते अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिली आहे. दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला करुन पठाणकोट दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा कट आखण्यात आला होता. दिल्ली एनसीआरमध्ये हे हल्ले करण्यात येणार होते. मात्र दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीच्या बाहेर तसंच उत्तर आणि पश्चिम दिल्लीत छापेमारी करत 12 दहशतवाद्यांना अटक केली होती. यामध्ये या तीन दहशतवाद्यांचादेखील समावेश आहे.त्यांची चौकशी केली असता ही माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांचा म्होरक्या साजीदला उत्तर-पूर्व दिल्लीच्या चांदबाग नगरमधून अटक करण्यात आली होती. तर शाकीर आणि समीर यांनी उत्तरप्रदेश आणि गोरखपूरमधून अटक करण्यात आली होती.
एक जिवंत तसंच एक खराब एलईडी, 250 ग्राम स्फोटकं, दोन टायमर डिव्हाईस, दोन पाईप, 11 बॅटरींसह इतरही साहित्य या तिघांकडून जप्त करण्यात आलं आहे. यातील दोन दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या भावाशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्कात होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अजून अटकेची कारवाई केली जाऊ शकते असं विशेष पोलीस आयुक्त अरविंद दीप यांनी म्हटलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या दहशतवाद्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्यदेखील घुसखोरी करण्यात यश मिळवलं आहे.
मसूद अजहरची भाषणे ऐकून मी प्रभावित झालो होतो आणि त्यानंतर दहशतवादी संघटनेशी संपर्कात आलो अशी माहिती साजीदने पोलीस तपासात दिली आहे. साजीदच्या दिल्लीतील घरात सोमवारी अपघाताने आयईडी बॉम्बचा स्फोट झाला होता. ज्यामध्ये त्याचा हात भाजला होता. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करत छापेमारीला सुरुवात केली होती. संशयास्पद हालचालींमुळे साजीद अगोदरच गेल्या सहा महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता.
बुधवारी दिल्ली पोलिसांच्या 12 पथकांनी 13 ठिकाणी छापेमारी करत संशयितांना ताब्यात घेतलं होतं. यातील तिघांविरोधात पुरावे सापडल्याने पोलिसांनी तिघांना अटक केली होती. साजीर, शाकीर आणि समीर यांना न्यायालायत हजर केले असता 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.