लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काबूलमधील तुरुंगात कैदेत असलेले जैश-ए-माेहम्मद या दहशतवादी संघटनेच्या सुमारे १००हून अधिक दहशतवाद्यांना साेडण्यात आले हाेते. हे सर्व दहशतवादी भारतात हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. विशेषत: जम्मू आणि काश्मीरमध्ये जास्त धाेका असल्याचे सांगण्यात आले आहे.
तालिबानने अल-कायदा, जैश तसेच लष्कर-ए-ताेयबाच्या दहशतवाद्यांना काबूलच्या तुरुंगातून साेडले हाेते. त्यांच्या संदर्भातील काही गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाली आहे. हे सर्व दहशतवादी संघटनेमध्ये परतले असून, पुन्हा सक्रिय झाले आहेत. तसेच ‘जैश’चा म्हाेरक्या मसूद अझहरसंबंधी काही लिंक साेशल मीडियावरही टाकण्यात आल्या आहेत. त्यात त्याने दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ले करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्याचे उघडकीस आले आहे. तालिबान आणि ‘जैश’च्या काही वरिष्ठ सदस्यांनी काही दिवसांपूर्वी बैठकही घेतली हाेती. त्यात भारताला लक्ष्य करण्यासाठी सर्वप्रकारची मदत करण्यासाठी ‘जैश’ने तालिबानला आश्वासन दिल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.
अफगाणिस्तानातील घडामाेडींनी ‘जैश’ला बळ भारतीय सुरक्षा दलांनी यावर्षी ‘जैश’च्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पुलवामा येथे लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाइंड माेहम्मद इस्माईल आणि अब्दुल गाझी यांनाही ३१ जुलै राेजी ठार करण्यात आले. या दाेघांनी अनेक हल्ले घडवून आणले. तसेच काश्मीरमध्ये अनेक तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील करून घेतले. त्यांना ठार केल्यामुळे ‘जैश’ला माेठा धक्का बसला हाेता. मात्र, अफगाणिस्तानातील घडामाेडींनी संघटनेला पुन्हा बळ दिल्याचे संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितले.