नवी दिल्ली- पाकिस्तानमधील ‘जैश-ए- मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर भारतातील काही टॉप राजकीय नेत्यांना निशाणा बनविण्याच्या मार्गावर आहे. केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते ‘जैश-ए- मोहम्मद’च्या रडारवर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ‘जैश-ए- मोहम्मद’चा प्रमुख मौलाना मसूद अझहरने भारतातील नेत्यांना टार्गेट करण्यासाठी दहशतवाद्यांचं एक पथक तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील काहींनी बांगलादेशमार्गे भारतात प्रवेश केला असून गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांची गेल्याच आठवड्यात विशेष बैठक झाली. त्यात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर प्रमुख नेते असल्याची मिळालेली माहिती संबंधित राजकीय पक्षांना देण्यात आली आहे. ‘जैश-ए- मोहम्मद’ आणि ‘लष्कर- ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनांनी एकत्र येऊन भारतातील केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि भाजपाच्या नेत्यांवर हल्ल्यांचा कट रचला आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. ‘ज्या मुख्यमंत्र्यांना कमी सुरक्षा त्यांनाच लक्ष्य करण्याची योजना दहशतवादी संघटनांनी आखली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यासाठी बांगलादेश कॅडरमधील दहशतवाद्यांची मदत घेतली जात आहे. यातील काही दहशतवाद्यांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. गुप्तचर यंत्रणांनी या बद्दलची माहिती जमा करण्यासाठी ढाकाजवळ लपून बसलेल्या दहशतवाद्यांची माहिती बांगलादेशमधील सुरक्षा यंत्रणांना दिली होती. बांगलादेशमधील सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या पत्त्यांवर धडकही दिली, मात्र तिथून ठोस माहिती हाती लागली नाही, असं सूत्रांकडून समजतं आहे
अझहरविरोधात भारताचे प्रयत्न आणि त्याचा भाचा तल्हा रशीदचा सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत खात्मा केल्याने ‘जैश-ए-मोहम्मद’ला संघटनेला धक्का बसला. याचा वचपा काढण्यासाठी मसूद अझहर प्रयत्न करु शकतो, असं सांगितलं जातं आहे. पुलवामा आणि अन्य भागांमधील दहशतवादी हल्ल्यांमागे तल्हा रशीदचा सहभाग होता. जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशवाद्यांची संख्या वाढताना दिसते आहे. जम्मू- काश्मीरमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’ची जागा घेण्याचा ‘जैश-ए-मोहम्मद' या प्रयत्न आहे.