न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) उच्चस्तरीय सत्रासाठी येथे आल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या जागतिक समपदस्थांसोबत अनेक द्विपक्षीय व बहुपक्षीय बैठका घेतल्या. यात द्विपक्षीय संबंध बळकट करण्याबाबत तसेच समान समस्यांच्या मुद्द्यांवर त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण केली. जयशंकर शुक्रवारी पहाटे न्यूयॉर्कला पोहोचले. त्यांनी आपल्या व्यग्र दिवसाची सुरुवात क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीने केली. त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग व जपानचे परराष्ट्र मंत्री योको कामिकावा यांच्या भेटी घेतल्या.
क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात संयुक्त राष्ट्र, परस्परांच्या सहमतीने आखलेले नियम, मानदंड व मानके कायम ठेवणे आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत क्वाड सहकार्य वाढविण्याच्या शाश्वत महत्त्वाप्रति अटळ बांधिलकीचा पुनरुच्चार केला. जयशंकर यांनी जपानचे परराष्ट्रमंत्री कामिकावा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली व ‘विशेष व्यूहात्मक, जागतिक भागीदारी’वर त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण केली. त्यानंतर, त्यांनी आयबीएसए (भारत, ब्राझील व दक्षिण आफ्रिका) गटांतर्गत दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्री नालेदी पंडोर आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री मौरो व्हिएरा यांच्याशी चर्चा केली. भारतीय संसदेने ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मंजूर केल्याचे जयशंकर यांनी पंडोर आणि व्हिएरा यांना सांगितले. तेव्हा दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी त्याचे कौतुक केले आणि भारताचे अभिनंदन केले. बहारीनचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल लतीफ बिन रशीद अल झयानी यांच्याशी त्यांची द्विपक्षीय बैठक झाली. (वृत्तसंस्था)