श्रीनगर : बंदी असलेल्या ‘जैश-ए-मोहम्मदच्या’ (जेईएम) दहशतवाद्यांनी विशेष पोलीस अधिकारी फयाज अहमद, त्यांची पत्नी राजा बेगम आणि मुलगी रफिया (२२) यांची गोळ्या घालून हत्या केली, राजकीय पक्ष व नेत्यांनी या हत्येचा निषेध केला आहे.
पोलीस महानिरीक्षक (काश्मीर रेंज) विजय कुमार यांनी सोमवारी सांगितले की, “दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरातील हरिपारिगममध्ये फयाज अहमद, त्यांची पत्नी व मुलगी घरात असताना रविवारी रात्री ११ च्या सुमारास दहशतवादी घुसले व त्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.” फयाज अहमद यांचे घर दक्षिण श्रीनगरपासून ५० किलोमीटरवर आहे. अहमद यांना रुग्णालयात आणल्यावर मृत घोषित करण्यात आले, तर रात्री त्यांच्या पत्नीचा आणि मुलगी रफिया हिचा सकाळी मृत्यू झाला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी त्या भागाची नाकेबंदी केली गेली; परंतु अजून कोणाला अटक झालेली नाही.विजय कुमार म्हणाले की, “या हत्येत एका विदेशीसह जेईएमचे दोन दहशतवादी सहभागी होते.” फयाज अहमद यांच्यावर हल्ला झाल्यावर पत्नी व मुलीने त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला; पण त्या जखमी झाल्या,” या भागात अतिरेक्यांच्या हालचाली आहेत.