जम्मू : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या दाैऱ्यापूर्वी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा जैश-ए-माेहम्मदचा माेठा कट उद्ध्वस्त करण्यात आला आहे. जम्मूजवळ सुरक्षा दलांनी चकमकीत दाेन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, दहशतवाद्यांच्या गाेळीबारात सीआयएसएफचे एक सहायक पाेलीस निरीक्षक शहीद झाले आहेत; तर बारामुल्लामध्ये गुरुवारपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-ताेयबाच्या आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.
जम्मूचे अतिरिक्त पाेलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले, की सुंजवा कॅम्पजवळ दाेन दहशतवादी दिसून आले. त्याच वेळी सीआयएसएफची एक बस १५ जवानांना घेऊन जम्मू विमानतळाकडे निघाली.
या बसवर त्यांनी गाेळीबार -करून ग्रेनेड फेकला. त्यात एएसआय एस. पी. पटेल शहीद झाले; तर दाेन जवान जखमी झाले. यानंतर दहशतवादी एका घरात लपले. जवानांनी घराला घेरल्यानंतर उडालेल्या चकमकीत दाेन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. सीआयएसएफच्या चाैकीवर शिफ्ट बदलण्याची वेळ दहशतवाद्यांनी हेरून हल्ला केला.
सांबा सीमेवरून दहशतवाद्यांची घुसखाेरीदहशतवाद्यांकडून आत्मघाती बेल्ट जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे ते आत्मघातकी माेहिमेवर असण्याचा संशय आहे. मात्र, त्यांचे नेमके लक्ष्य काय हाेते, याचा तपास सुरू आहे. सांबा जिल्ह्यातील सीमा पार करून ते भारतात दाखल झाल्याचा संशय आहे.
शहीद झालेले ५८ वर्षीय एस. पी. पटेल हे मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील हाेते. याशिवाय ९ जवान जखमी झाले आहेत. पटेल यांना सीआयएसएफ व सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.