ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ९ - बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची जनता दल संयुक्त पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. मांझी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी मांझींना पक्षातून बाहेर काढले.
बिहारची सत्ता पुन्हा आपल्या हाती घेऊ इच्छिणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्यातील संघर्ष काही दिवसांपासून टीपेला पोचला आहे.नितीशकुमार यांच्याच पुण्याईने मुख्यमंत्री बनलेले मांझी यांनी जनता दल(युनायटेड) या स्वपक्षाविरुद्धच बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने या संघर्षाची तीव्रता आणखी वाढली होती. मांझी यांनी राजीनामा द्यावा असा आदेश पक्षातर्फे देण्यात आला होता, मात्र त्यांनी पद सोडण्यास नकार दिला. त्यांनी शनिवारी तातडीची बैठक बोलावून विधानसभा विसर्जनाचा प्रस्ताव मांडला होता, मात्र मंत्रिमंडळाने तो धुडकावून लावला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याने बिहारच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा आरूढ होण्याचा त्यांचा मार्ग प्रशस्त झाला होता.
मात्र रविवारी हा राजकीय संघर्ष दिल्लीत भाजपाच्या दरबारी पोहोचला. नीती आयोगाच्या बैठकीनिमित्त दिल्लीत आलेले बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे असे टीकास्त्रही मांझी यांनी सोडले.
या सर्व घटनांनतर अखेर पक्षाने मांझींवर कारवाई करत हकालपट्टी केली.