रघुनाथ पांडे, नवी दिल्लीजैतापूर अणूऊर्जा प्रकल्पातील उणिवा शास्त्रीय पद्धतीने दूर केल्या जातील, मात्र प्रकल्प रद्द होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. शिवसेनेचा प्रकल्पाला असलेला विरोध पंतप्रधानांनी आठ मिनिटांच्या भेटीत मोडून काढला. प्रकल्पांना विरोध करून आपण त्या भागातील रोजगाराच्या संधी गमावण्यासोबतच तेथील विकासही थांबवितो. गुजरातमध्ये मेहसाणा भागातील विकास असाच स्थानिकांच्या अडवणुकीमुळे झाला नाही, याचा दाखला देतानाच विरोधामुळे सरकार विकास थांबवणार नाही, असेही खडेबालही पंतप्रधानांनी शिवसेनेच्या खासदारांना ऐकविले.विशेष म्हणजे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांची भेट रखडविण्याचेही प्रयत्न करून पाहिले, मात्र सकाळी झालेल्या तणातणीनंतर पंतप्रधान कार्यालय नरमले आणि दुपारची वेळ देण्यात आली.नेपाळपासून भारतापर्यंत वारंवार येणारे भूकंपाचे धक्के लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी शिवसेनेने पंतप्रधानांकडे केली. शिवसेना नेते खा. संजय राऊत व प्रवक्ते खा. अरविंद सावंत यांच्या नेतृत्वातील खासदारांच्या शिष्टमंडळाने बुधवारी दुपारी संसदेत ही भेट घेतली. शिवसेनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात जैतापूर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहेत. हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, जपानमधील अणू प्रकल्पांना जसा धोका पोहोचला तसाच इथे पोहोचू शकतो, असे कळकळीने सांगितले.
जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प होणारच!
By admin | Published: May 14, 2015 2:45 AM